माझं गांव माझं शहर | परंडा
परंडा तालुक्यातील भोंजा शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या कुंभेजा येथील १९ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे कुंभेजासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम नागेश ननवरे (वय १९, रा. कुंभेजा, ता. परंडा) हा मित्रांसोबत भोंजा शिवारातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत शुभम ननवरे, ओंकार हुसेन जाधव व इतर मित्रही उपस्थित होते. पोहत असताना शुभमचा पाण्यात अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
घटनेनंतर मित्रांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. काही युवकांनी विहिरीत बुड्या मारून शोधकार्य सुरू केले. मात्र बराच वेळ शोध घेऊनही शुभम सापडत नव्हता. त्यानंतर विहिरीतील पाणी मोटारींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
शुभम हा शिक्षण व कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होता. सुटीनिमित्त गावी आल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे ननवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
