परंडा, दि. 16 (माझं गांव माझं शहर): श्री हंसराज स्वामी महाराज यांच्या 171 व्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुण्यतिथी उत्सव दि. 22 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
दि. 22 एप्रिल रोजी श्रीराम महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार असून, रात्री 8 वाजता गायनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. या गायनसंध्येत सौ. अपर्णा पाटील, प्रसाद सहस्रबुद्धे, अमोल काळे, फारूक पिंजारी आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
दि. 23 एप्रिल रोजी श्री हंस भजनी मंडळ यांचे भजन होणार असून, रात्री 8 वाजता भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम रंगणार आहे.
दि. 24 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता रुद्राभिषेक व पूजा होणार असून, सकाळी 6 वाजता प्रयाणकाळी गुलाल उधळून पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजता संतोष सूर्यवंशी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 8.30 वाजता ह.भ.प. संजय महाराज झानपुरे (तात्या) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री हंस मंडळ, परंडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.