परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपरिषदेत आज दि. ८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शिवप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. आघाडीच्या १३ सदस्यांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शवला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत सदस्य समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांनी ठराव मांडला, तर अब्बास उमर मुजावर यांनी त्यास अनुमोदन दिले. चर्चेनंतर सभागृहातील बहुसंख्य सदस्यांनी ठरावाला समर्थन देत तो सर्वसंमतीने मंजूर केला.
या निर्णयामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच पुतळा उभारणीसाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुतळा उभारणीसंदर्भातील सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबी पूर्ण करूनच काम हाती घेण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि इतिहासाची प्रेरणा देणारा हा पुतळा लवकरच उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.