जिद्द आणि चिकाटीचा विजय: मोलमजुरी करून आईने मुलांना शिकवलं, मुलगा झाला पोलीस!

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ ता.परडा येथील निसार शेख झाला पोलिस “कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आभाळही ठेंगणं असतं,” याचाच प्रत्यय कुभेफळ ता परंडा येथील एका माऊलीने आणून दिला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, अत्यंत बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले आणि आज तिचा मुलगा पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दीत त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
संघर्षाचा प्रवास:
काही वर्षांपूर्वी घरचा कर्ता पुरुष, म्हणजेच वडिलांचे निधन झाले. पदरात दोन मुले आणि एक मुलगी अशा तिन्ही मुलांची जबाबदारी आईवर पडली. घरात उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते की शेतीवाडी. अशा वेळी खचून न जाता या माऊलीने दुसऱ्याच्या शेतात आणि घरांमध्ये मोलमजुरी करायला सुरुवात केली. स्वतः उपाशी राहून पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
मुलाचे यश:
आईचे कष्ट पाहून मुलानेही जिद्दीने अभ्यास केला. कोणत्याही महागड्या क्लासची सोय नसताना, घरची परिस्थिती सुधारण्याच्या ओढीने त्याने रात्रं-दिवस मेहनत घेतली. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत त्याची निवड झाली. प्रशिक्षणांनंतर जेव्हा तो पोलीस गणवेशात आपल्या आईसमोर उभा राहिला, तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
आईची प्रतिक्रिया:
“माझ्या कष्टाचं आज चीज झालं. मुलांनी शिकावं आणि मोठं व्हावं एवढंच स्वप्न होतं. आज मुलगा पोलीस झाला, आता आमचे गरिबीचे दिवस संपले,” अशी भावना आईने व्यक्त केली.
आज या कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसे मिळवावे, याचा आदर्श या कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे. जालना येथे जाऊन आई .बहीन . भाऊ व नातेवाईक यांनी निसार शेख यांचा सत्कार केला.
त्याला शुभेच्छा देण्यात आल्या निसार शेख बघितल्या नंतर आईचे डोळे भरून आले . निसार शेख यांना त्याच्या वडलाची आठवन आल्या नंतर तो आईला मिठी मारून रडला.परडा तालुक्यातून व गावामधून  कौतुक होत आहे .

error: Content is protected !!