परंडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार ; बसफेऱ्यांच्या अनियमितेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

परंडा (प्रतिनिधी) परंडा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगाराचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसगाड्यांच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आगाराच्या या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बार्शी मार्गावर प्रवाशांची कोंडी: मिळालेल्या माहितीनुसार, परंडा ते बार्शी या महत्त्वाच्या मार्गावर बसच्या वेळेचे कोणतेही नियोजन उरलेले नाही. सकाळी १० वाजेनंतर थेट दुपारी १ वाजेपर्यंत एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. बार्शी हे शिक्षणाचे आणि व्यापाराचे केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, दुपारी तीन-तीन तास बस नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक लूट सोसावी लागत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान: ग्रामीण भागातून परंडा ते बार्शी येथे शिक्षणासाठी व उपचारासाठी जाणाऱ्या नागरीक व विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सकाळी वेळेवर बस न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास बुडत आहेत. तसेच सायंकाळी घरी परततानाही बसची खात्री नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “आम्ही पासचे पैसे भरूनही आम्हाला वेळेवर बस मिळत नाही, मग या पासचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.
प्रशासनाकडून दुर्लक्ष:- या संदर्भात प्रवाशांनी अनेकदा आगार प्रमुखांकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे. जर तातडीने या मार्गावरील बस फेऱ्या नियमित चालू कराव्यात.परंडा आगाराने बार्शी मार्गासह इतर ग्रामीण भागातील बस फेऱ्यांचे नियोजन त्वरित सुधारावे आणि प्रवाशांची होणारी ही गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरीकातून होत आहे .

error: Content is protected !!