परंडा (माझं गांव माझं शहर) येथील बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शासनाने शाळा व महाविद्यालय स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या असून, त्याच अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. नारायण खैरे हे होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून श्री. वजीद पठाण, श्री. सचिन मोरे, श्री. प्रमोद डोके, श्री. विकास वाघमारे, श्री. शुभम रोडगे, प्रभाकर मिरगणे, श्री. दत्तात्रय थोरात तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. नारायण खैरे यांनी शासनाच्या धोरणांची माहिती देत माजी विद्यार्थी संघाची भूमिका स्पष्ट केली. शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी श्री. विकास वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास व मूल्यशिक्षण याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांमधून अजिक्य कोळगे, सुजित रोडगे व प्रविण गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला व आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धोंडीराम दुधे यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. संजय वलेकर यांनी करताना शासनाच्या सूचनांनुसार माजी विद्यार्थी संघाचे महत्त्व स्पष्ट केले. शेवटी श्री. नागनाथ काळदाते यांनी उपस्थित मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे माजी व सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद, एकोपा व आपुलकी निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा वाढल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
You must be logged in to post a comment.