परंडा पंचायत समितीत धक्कादायक प्रकार! तक्रारदाराला बीडीओसमोरच मारहाण; उलट तक्रारदारावर गुन्हा

परंडा (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समिती कार्यालयात तक्रारदाराला अधिकाऱ्यांच्या दालनातच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील कंडारी येथील आंबादास वाघमारे यांनी पंचायत समितीतील काही तक्रारी संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. याच अनुषंगाने ते १५ एप्रिल रोजी पंचायत समिती परंडा येथे बीडीओ यांच्या दालनात तक्रारीवर काय कारवाई झाली, याची विचारणा करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी संबंधित ग्रामसेवकाने तीन जणांना बोलावून बीडीओसमोरच कार्यालयात तक्रारदार आंबादास वाघमारे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ क्लिपही असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या तक्रारीमागे पंचायत समितीतील काही गंभीर बाबी असून, मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!