परंडा | प्रतिनिधी
भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली असून, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. परंडा येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत आणि दत्ता मोहीते यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन सदस्यांचे पुष्पगुच्छ व भाजपचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले.
भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख कार्यकर्ते
या सोहळ्यात शिवसेना (उ.बा.ठा.) तालुका प्रमुख सुधीर ढगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिगंबर ढगे, हिरालाल ढगे, शेषराव ढगे, गणेश कावळे, बाबासाहेब अंधारे, शिवसेना (उ.बा.ठा.) माणकेश्वर विभागप्रमुख प्रमोद ढगे, अविनाश ढगे, मधुकर ढगे, अमर हेळकर, तानाजी ढगे, चैतन्य ढगे, सागर ढगे, निलेश ढगे, पुंडलिक ढगे, समाधान ढगे, रामभाऊ ढगे, गणेश ढगे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच चिंचपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भूम-परंडा परिसरात भाजपची ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“विकासाच्या योजनांमुळे भाजपवर विश्वास वाढला” – सुजितसिंह ठाकूर
यावेळी बोलताना सुजितसिंह ठाकूर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या योजनांमुळे सामान्य नागरिकांचा भाजपावरील विश्वास वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तर धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
