बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३० मे) सकाळी सुमारे सातच्या सुमारास आरव हा क्रिकेट सरावासाठी शिवशक्ती मैदानावर गेला होता. यावेळी क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर मैदानावरील मुलांकडून ओढून घेतला जात होता. फिर्यादीतील आरोपानुसार, प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार काही अल्पवयीन मुले हा रोलर ओढत असताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यानंतर जड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर मैदानावरील उपस्थितांनी आरवला तातडीने उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मृत मुलाचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट मैदानावरील जड रोलर हाताळण्यासाठी कोणतीही प्रशिक्षित किंवा प्रौढ व्यक्ती नियुक्त करण्यात आली नव्हती. उलट क्रिकेट प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलांकडूनच हे धोकादायक काम करून घेतले जात होते. अशा प्रकारच्या कामातून अपघात होऊ शकतो याची जाणीव असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे तसेच क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देबडवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बाल न्याय कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांकडून मैदानावरील जड यंत्रसामग्री हाताळून घेतली जात असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. क्रीडा शिबिरांमधील सुरक्षा मानके, प्रशिक्षकांची जबाबदारी आणि आयोजकांकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गलगटे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, घटनेच्या वेळी मैदानावरील परिस्थिती, उपस्थित साक्षीदारांचे जबाब, सुरक्षा व्यवस्थेची स्थिती आणि फिर्यादीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
