आ. तानाजीराव सावंत यांच्या पुनरागमनाची चर्चा; धाराशिवच्या राजकारणात पुन्हा खळबळ
परंडा | माझं गांव माझं शहर | दि. ३० मे
दिल्लीतील राजकीय हालचालींनंतर राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून धाराशिव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा सत्तेच्या राजकारणात चर्चेत आले आहे. माजी आरोग्यमंत्री तथा तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच दिल्ली येथे महायुतीतील काही वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप तसेच नाराज आमदारांच्या समेटाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीपासूनच तानाजीराव सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र सत्तेतील समतोल आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर सावंत समर्थकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचीही चर्चा होती.
आता बदलत्या राजकीय घडामोडींमुळे पुन्हा एकदा तानाजीराव सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील चर्चांनंतर परंडा मतदारसंघात मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले असून कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे.
तानाजीराव सावंत यांना प्रत्यक्षात मंत्रीपदाची संधी मिळणार का, तसेच मिळाल्यास कोणते खाते त्यांच्या वाट्याला येणार, याकडे आता मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या संदर्भातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You must be logged in to post a comment.