करमाळा तालुक्यात विकासाचा बोजवारा; ‘श्रेयवादाच्या’ राजकारणावर शेतकऱ्यांचा संताप

डिकसळ पूल, आदिनाथ कारखाना, रस्ते आणि वीज प्रश्नांवरून आजी-माजी आमदारांवर गंभीर आरोप

करमाळा,माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांवरून आजी-माजी लोकप्रतिनिधींवर ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डिकसळ पूल, आदिनाथ सहकारी साखर कारखाना, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, वीज समस्या आणि वाढती अवैध वाळू चोरी या प्रश्नांवर कोणतीही ठोस कृती न करता केवळ “श्रेयवादाचे राजकारण” सुरू असल्याचा आरोप संदीप उर्फ बाबुराव सरडे (रा. चिखलठाण, ता. करमाळा) यांनी केला आहे.

१२ वर्षांपासून डिकसळ पुलाचा प्रश्न प्रलंबित

करमाळा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा डिकसळ पूल हा या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र गेल्या १२ वर्षांपासून या पुलाचे काम रखडलेले असून, विविध नेत्यांकडून फक्त घोषणाबाजी आणि श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन आमदार नारायण पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी पुलासाठी निधी आणल्याचे दावे केले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात आजही पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.

विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल

डिकसळ पुलाच्या दुरवस्थेमुळे इंदापूर तालुक्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच बारामती ॲग्रो आणि अंबालिका कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सरडे यांनी सांगितले.

आदिनाथ कारखान्यावरूनही प्रश्नचिन्ह

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरूनही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कारखाना सुरू करण्यात आला, मात्र कोट्यवधींचे कर्ज मिळूनही कारखान्याची स्थिती समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात आला.

“कारखाना सक्षम नेतृत्वाकडे दिला असता तर आज तो कर्जमुक्त झाला असता आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असता,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

रस्ते, वीज आणि वाळू चोरीचा मुद्दा

तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून वीजपुरवठ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय उजनी धरण परिसरात वाढती वाळू चोरी आणि जुगार व्यवसायाबाबतही प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

शंभूराजे जगताप प्रकरणावरून आरोप

शंभूराजे जगताप यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरही सरडे यांनी प्रशासनावर आणि काही लोकप्रतिनिधींवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती आमदारांच्या शिफारशीवर झाल्याचाही दावा त्यांनी केला.

“खरा विकास शिक्षण संस्थांमुळे”

कै. नामदेवराव जगताप आणि जयवंतराव जगताप यांनी तालुक्यात शिक्षण संस्थांचे जाळे उभे करून खऱ्या अर्थाने विकास साधल्याचे सरडे यांनी म्हटले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तसेच विविध शिक्षण संस्था आणि डीएड कॉलेज यांचा उल्लेख त्यांनी केला.

“आम्हाला श्रेय नको, विकास हवा”

“जनतेने निवडून दिल्यानंतर काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, उपकार नाहीत. तालुक्याचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते आणि वीज यावर तातडीने उपाययोजना व्हायला हव्यात. अन्यथा जनता आता शांत बसणार नाही,” असा इशारा संदीप उर्फ बाबुराव सरडे यांनी दिला.

error: Content is protected !!