परंडा (प्रतिनिधी): परंडा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत जातीवाचक अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ९ मे) परंडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची व कठोर कारवाईची मागणी समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत जगदीश सोंडगे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जातीवाचक अपशब्द वापरल्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दि. २६ एप्रिल रोजी शहरातील नागरिक व पत्रकार निसार मुजावर यांनी शहरात दोन-तीन दिवसांपासून कचरा घंटागाडी आली नसल्याबाबत मोबाईलवरून विचारणा केली असता, नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी अश्लील व जातीवाचक भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परंडा हे सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदणारे शांतताप्रिय शहर असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी जाती-धर्मावरून अपमानास्पद भाषा वापरणे ही गंभीर बाब असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
या प्रकरणी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही निलंबनाची अथवा कठोर कारवाई न झाल्याने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडई पेठ, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक आणि महात्मा फुले चौक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, मुस्लिम समाज आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
