माझं गाव माझं शहर |प्रतिनिधी : तानाजी घोडके
परंडा पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढासळल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी केलेल्या तक्रारी धूळ खात पडल्या असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुहूर्त कधी लागणार?” असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तक्रारींचा पाऊस; कारवाई मात्र शून्य
कुंभेफळ, डोमगाव, आसू, भोत्रा आदी गावांमधून ग्रामपंचायत कारभारातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि प्रशासकीय दुर्लक्षाबाबत अनेक तक्रारी पंचायत समितीकडे दाखल झाल्या आहेत. मात्र या तक्रारींवर सुनावणी न घेता वारंवार तारखा देण्याचा प्रकार सुरू असून, नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे.
विस्तार अधिकारीही निष्क्रिय?
तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री हालचाली दाखवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे.
लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद
नागरिक पंचायत समितीचे उंबरठे झिजवत असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र गप्प असल्याचे चित्र आहे. प्रशासनावर कोणताही अंकुश नसल्याने अधिकारी मनमानी करत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
“जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे नेते आता कुठे गेले?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
बदलीच्या चर्चेमुळे संताप वाढला
गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या बदलीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे. प्रलंबित तक्रारी निकाली न काढता बदली होणे म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
“जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत बदली रद्द करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आंदोलनाचा इशारा
परंडा पंचायत समितीतील विस्कळीत कारभार तात्काळ सुधारावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रशासन जागे होणार की नागरिकांचा संयम संपणार, याकडे संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
