टाकळी यमाई देवी मंदिरात दरोडा; दानपेटी चोरी, पोलिसांकडून तपास सुरू

परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील टाकळी येथिल प्रसिद्ध यमाई देवी मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने धाडसी दरोडा घालत दानपेटी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११, १२ व १३ मे रोजी यमाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली होती. यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी देवीच्या जयघोषात दर्शन घेत नवस अर्पण केले होते. या काळात दानपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने मंदिर परिसरात प्रवेश करून दानपेटीच पळवून नेली. सकाळी मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील गुप्त वाटा व ठसे पावले हे तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण असून मंदिर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांकडून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!