सोनारी यात्रा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय सावंत; उपाध्यक्षपदी युवराज पाटील

परंडा, दि. २(तानाजी घोडके) : तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांची तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी यात्रा उत्सवाच्या नियोजनाला वेग आला आहे.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोनारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच येणाऱ्या यात्रा उत्सवाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यात्रेदरम्यान भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य सुविधा याबाबत ठोस नियोजन करण्यावर भर देण्यात आला. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीस माजी सरपंच परमेश्वर मांडे, संभाजी सुरवसे, गुरुदास मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर मोरे, चेअरमन बाबासाहेब पाटील, उद्योजक सचिन पवार, जयराम नलवडे, बंडू हांगे, महादेव सांगडे, आबासाहेब हांगे, पद्माकर तोडकरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा ही परिसरातील एक महत्त्वाची धार्मिक परंपरा मानली जाते. दरवर्षी हजारो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी यात्रा अधिक सुव्यवस्थित आणि आकर्षक करण्यासाठी समितीने विशेष नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!