परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाणीपुरवठा व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठत प्रशासनाशी थेट चर्चा केली.
या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसमोर ठाम भूमिका मांडत, “वीज कपात तात्काळ थांबवून नियमित व सुरळीत वीज पुरवठा करावा,” अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीज उपलब्ध नसल्यामुळे पिके करपण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद सदस्य मा. धनंजय दादा सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा स्पष्ट इशारा देत, बळीराजाच्या हक्कासाठी कोणतीही भूमिका घेण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी व स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
या आंदोलनात तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे.