परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत; तानाजी सावंतांना मोठा धक्का

परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दुटप्पी राजकारणाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लागला आहे. सावंतांनी लोकसभेत महायुतीच्या धर्माला हरताळ फासत विरोधकांशी पडद्यामागून हातमिळवणी केल्याचा आरोप करत, त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत आणि अपक्ष सदस्यांनी आता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता आणखी सोपा झाला आहे.

सावंतांच्या ‘दुटप्पी’ भूमिकेचा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला रसद पुरवून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सावंतांनी प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा निवडून आलेल्या सदस्यांनी केला आहे. “हाफकिन” आणि “खेकडा” यांसारख्या विधानांनी जिल्ह्याची नाचक्की करणाऱ्या सावंतांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत, त्यांचे पुतणे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच काकांच्या नेतृत्वाचा त्याग केला आहे. त्यांनी अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

परंड्यासह उमरग्याच्या दोन अपक्ष सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिली आहे. परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवनाथ ढोरे यांनी आमदार तानाजी सावंतांची साथ सोडून राणाजगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलुर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील या अपक्ष सदस्यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.

सध्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून, यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:
भाजप: १९
राष्ट्रवादी काँग्रेस: ०६
शिवसेना (शिंदे गट): ०७
अपक्ष: ०४
एकूण: ३६ सदस्य
हे सर्व सदस्य सध्या सहलीवर असून, सावंतांच्या विरोधकांना मदत करण्याच्या छुप्या राजकारणामुळे तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या त्रासाचा पाढाच या सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वाचला आहे. या राजकीय भूकंपामुळे जिल्ह्यात सावंतांचे वर्चस्व धोक्यात आले असून राणाजगजितसिंह पाटलांची पकड मजबूत झाली आहे.

error: Content is protected !!