दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक योजना : २०० विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे वाटप

धाराशिव (प्रतिनिधी) दि.८ जानेवारी : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून वैयक्तिक व सामूहिक योजना राबविण्यात येतात.वैयक्तिक योजनेअंतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या प्रथम २०० विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २० हजार रुपये प्रमाणे किसान विकास पत्र देण्याची योजना राबविण्यात आली आहे.

या योजनेतून लाभ देण्यात येणाऱ्या प्रथम २०० विद्यार्थ्यांची यादी तसेच ४० लाख रुपयांचा धनादेश २ जानेवारी २०२६ रोजी टपाल खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पोस्टाच्या किसान विकास पत्रासाठीचे अर्ज परिपूर्ण करून घेण्याची कार्यवाही सुरू होती.

ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी, शिक्षणाधिकारी श्री.मापारी तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्ह्यात अशा प्रकारची दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भरीव योजना प्रथमच राबविण्यात येत असून येत्या आठ दिवसांत किसान विकास पत्र तयार होऊन विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात येतील,असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!