परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल अजय माळी यांना तीन सत्रांचे निमंत्रण असल्याने त्यांचा ऑनलाईन सहभागी आहे.
युनेस्को वारस्थळांच्या वार्षिक प्रस्तावांवर चर्चा होउन निकषात बसणा-या वारसास्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली जाते. याबैठकीसमोर नविन ३२ स्थळांना जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यतेसाठी आहेत. ११ जुलै पर्यंत जगातील ९ वारसास्थळांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या १२ किल्ल्यांचा रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदरी, जिंजी या समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंञी आशिष शेलार, युनेस्कोमधील भारतीय राजदूत विशाल शर्मा, प्रधान सचिव विकास खारगे,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. परंडा किल्ला जागतिक वारसास्थळ होण्यासाठी अजय माळी हे दस्तऐवजीकरण करत आहेत. यासाठी त्यांनी युनेस्को, आंतराष्ट्रीय वारसा समितीकडून शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले आहे.
- युनेस्कोच्या ४७व्या बैठकीत ड्राफ्ट डिसीजन ४७ कॉम ८ बी १६ अन्वये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या १२ किल्ल्यांचा “मराठा मिलिटरी लँडस्केपस” प्रस्तावास जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाली. यामुळे जागतिक वारसास्थळांची संख्या १२३२ झाली तर भारतातील जागतिक वारसास्थळे ४४ झाली आहेत. सन २०३० पर्यंत संस्कृतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उददीष्टे साध्य करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता आहे. -अजय माळी सदस्य आतंरराष्ट्रीय वारसा स्थळे व परिषद