बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल मोटेंची “राष्ट्रवादी पुन्हा “

भूम(तानाजी घोडके) परंडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राहुल मोटे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मत जाणून घेतले. यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे.

राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत मा.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतरही मोटे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला. गावागावांतील कार्यक्रम आणि नागरिकांच्या भेटीगाठींमुळे त्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले आहे.आता त्यांच्या संभाव्य पक्षबदलामुळे त्यांना सत्तेत थेट सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रवेशावेळी राहुल मोटे यांना महामंडळ किंवा राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणता येईल, हा यामागे मुख्य हेतू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
राहुल मोटे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे अजित पवार गटाची परंडा मतदारसंघावरच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीवर मोठा परिणाम होणार आहे. मागील काही दिवसात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी नाराजीचा सुर लगावला होता. या पक्षबदलाने पराभवामुळे काहीशा मरगळलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात नवा उत्साह संचारू शकतो. काही दिवसापासून राहुल मोठे समर्थक यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत आहे. मोटे यांच्यासारखा जनाधार असलेला नेता मिळाल्याने जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद निश्चितच वाढेल. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अजित पवार गट अधिक आक्रमकपणे उतरण्याची तयारी करू शकेल.

Leave a Reply

error: Content is protected !!