परंडा(प्रतिनिधी) येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर), सर्जेराव सखाराम डिकोळे (वय ४६, रा. लव्हळ, ता. माढा, जि. सोलापूर) आणि राजू सिध्दू शिंदे (वय ४०, रा. परंडा, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
धाराशिव (उस्मानाबाद) रेस्टॉरंट्स पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत होते. परंडा पोलीस ठाण्यात गुरंन १८८/२०२५ नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे, पथकाने बारलोणी येथे सापळा रचून संतोष गुंजाळ याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या इतर पाच साथीदारांची माहिती दिली.गुंजाळच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी परंडा येथील समता नगर झोपडपट्टी परिसरातून राजू शिंदे याला ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी सर्जेराव डिकोळे यालाही अटक केली.
या तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल, लुटलेले सोन्याचे दागिने आणि २३,५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १,९७,६७० रुपये आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी परंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.