परंडा दि.१८ (प्रतिनिधी) – परंडा, भूम, वाशी या तीन्ही तालुक्यातील महसूल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटल आहे की मागील काही दिवसांमध्ये परांडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेले असून ही अतिवृष्टी तिन्ही तालुक्यात सगळीकडेच झालेली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे, शेतीचे, जनावराचे नुकसान झाले आहे.
परंतु असे असताना सदोष प्रशासनाच्या पर्जन्यमापक यंत्रणेमुळे फक्त वाशी तालुक्यातीलच महसूल मंडळाचा समावेश अतिवृष्टीमध्ये झालेला असून भूम आणि परांडा तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश अतिवृष्टी मध्ये झालेला नाही. वास्तविक पाहता पाऊस हा सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर झालेला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी परंडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करणे आणि सरसकट सर्वाना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठीची उपाययोजना करण्यासाठी संबंधीतांना सूचना देण्यात याव्यात असे म्हटले आहे .