धाराशिव(दि.१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बदली प्रक्रियेला आज, शनिवारपासून, प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात, ‘संवर्ग एक’ मधील शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पसंतीच्या शाळा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत, बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना तब्बल ३० शाळांचा पर्याय नोंदवता येणार आहे. शाळांचे वाटप सेवाज्येष्ठतेच्या आधारावर केले जाईल. संवर्ग एकमधील शिक्षकांना शाळांचे पर्याय नोंदवण्यासाठी बदली पोर्टलवर १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू होती. यामध्ये बदलीसाठी पात्र शिक्षकांची नोंदणी करणे, रिक्त जागांची माहिती गोळा करणे, शिक्षकांचे संवर्गनिहाय वर्गीकरण, संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांच्या कागदपत्रांची तालुकास्तरावर पडताळणी करणे, तसेच तक्रारींवर सुनावणी घेणे यांसारख्या कामांचा समावेश होता. ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया आता पूर्ण झाली असून प्रत्यक्ष बदलीस सुरुवात झाली आहे.
बदली प्रक्रियेचे पुढील टप्पे:
■ संवर्ग एकमधील बदल्या पूर्ण झाल्यावर रिक्त झालेल्या जागा पुन्हा पोर्टलवर दर्शवल्या जातील.
■ त्यानंतर संवर्ग दोनमधील (पती-पत्नी एकत्रीकरण) शिक्षकांना शाळा निवडण्याची संधी दिली जाईल. या प्रवर्गात १०३ शिक्षकांची बदली होणार आहे.
■ यानंतर संवर्ग तीनमधील (अवघड क्षेत्रातील) शिक्षकांना पदे निवडण्याची सुविधा मिळेल. मात्र, जिल्ह्यात या संवर्गातील एकही शिक्षक नसल्याने, थेट संवर्ग चारमधील सर्वसामान्य शिक्षकांना शाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण २५०० शिक्षक बदलीसाठी पात्र असून, त्यापैकी ५०३ शिक्षकांनी संवर्ग एकमधून बदलीसाठी नोंदणी केली आहे, तर ५३५ शिक्षकांनी बदली नाकारण्याचा पर्याय निवडला आहे.