परंडा-मुंगशी साडेतीन किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; नाथांच्या पालखीपूर्वी काम पूर्ण होणार का?
परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)
आषाढी वारी जवळ येत असताना परंडा ते मुंगशी दरम्यानच्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वारकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असून आजही रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांतच नाथांच्या पालखीचे या मार्गावरून आगमन होणार आहे. हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी या रस्त्याने पायी प्रवास करतात. मात्र रस्त्याची सद्यस्थिती पाहता यंदाही वारकऱ्यांना धुळीच्या ढगांमधून, खड्ड्यांतून आणि अडथळ्यांनी भरलेल्या मार्गावरून खडतर प्रवास करावा लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालखी मार्ग की अडचणींचा मार्ग?
वारकरी संप्रदायासाठी पालखी मार्ग हा केवळ रस्ता नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा मार्ग आहे. परंतु प्रशासन आणि संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे या पवित्र मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काम सुरू करून ते अर्धवट सोडण्याची पद्धत नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर काही काळ यंत्रसामग्री आणि कामगार दिसले; मात्र त्यानंतर कामाचा वेग मंदावला आणि आता अनेक दिवसांपासून काम ठप्प असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धूळ, खड्डे आणि वाहतुकीतील अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाच्या आश्वासनांचा खेळ?
रस्ता विकासासाठी निधी मंजूर झाल्याचे आणि काम लवकर पूर्ण होईल, अशी आश्वासने वेळोवेळी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून येत नाही. पालखी सोहळा तोंडावर आलेला असतानाही संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती तातडी दाखवली जात नसल्याची भावना वारकऱ्यांमध्ये आहे.
वारकऱ्यांचा सवाल : भक्तीच्या मार्गालाही न्याय मिळणार का?
दरवर्षी हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. शासन विविध स्तरांवर वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा करत असताना प्रत्यक्ष पालखी मार्गाचे कामच रखडलेले असल्याने त्या घोषणांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
“वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासन खरोखरच गंभीर आहे का?”, “पालखी येण्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होणार का?”, “की यंदाही वारकऱ्यांना त्रास सहन करतच विठुरायाच्या दर्शनासाठी जावे लागणार?” असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक आणि वारकरी विचारू लागले आहेत.
झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार?
पालखी सोहळ्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना संबंधित विभाग, ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा वारकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा ठपका शासनावर येण्याची शक्यता आहे.
वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक निधीच्या योग्य वापराचा प्रश्न असलेल्या या रस्त्याबाबत प्रशासनाने त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
चौकट :- आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, पालखी आगमनापूर्वी रखडलेल्या या साडेतीन किलोमीटर रस्त्याला कामाचा वेग मिळतो की पुन्हा एकदा वारकऱ्यांनाच शासनाच्या निष्क्रियतेची किंमत मोजावी लागते.

You must be logged in to post a comment.