एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परंडा बसस्थानकात उत्साहात कार्यक्रम

परंडा, दि. १ जून | प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला ७८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परंडा बसस्थानकात सोमवारी (दि. १ जून) वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बससेवेच्या फलकाचे पूजन करण्यात आले तसेच प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी सेवेने १ जून २०२६ रोजी ७८ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्त परंडा बसस्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बसस्थानक आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बससेवेच्या फलक पूजनाने झाली.

यावेळी बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुष्प व पेढे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. वर्धापनदिनानिमित्त परंडा आगारास प्राप्त झालेल्या नव्या बसचे पूजन करण्यात आले. तसेच चालक व वाहकांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला आगार प्रमुख रामचंद्र शिंदे, वाहतूक निरीक्षक प्रिया गंगावणे, संजय कांबळे, प्रवाशी संघटना अध्यक्ष किरण शहा, निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुश जाधव, प्रकाश काशीद, पत्रकार प्रमोद वेदपाठक, व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष मुजीब काझी, गोरख देशमाने, सुरेश भागडे, वाहतूक नियंत्रक संजय कदम, जुल्फीकार जिनेरी, रामलिंग शिवलकर, लिपिक दीपक चैतन्य, उमेश पालके , आयुब जिनेरी यांच्यासह आगारातील कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बसस्थानकातील सेवक दिव्यांग प्रभाकर थिटे व सविता शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला. सूत्रसंचालन उमेश पालके यांनी केले.

– माझं गांव माझं शहर

error: Content is protected !!