परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन

परंडा | प्रतिनिधी

परंडा तालुक्यात वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने राज्य शासन व महावितरण प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, बसवलेले मीटर काढून जुने मीटर पूर्ववत करावेत तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हे निवेदन मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री Meghna Deepak Sakore Bordikar, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आबा शुक्ला, जिल्हाधिकारी धाराशिव, महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय धाराशिव, तहसीलदार परंडा आणि महावितरणचे उपअभियंता परंडा यांना देण्यात आले आहे.

महासंघाच्या निवेदनानुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदार ग्राहकांच्या अनुपस्थितीत किंवा पूर्वकल्पना न देता खाजगी जागेत प्रवेश करून जुने वीज मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवत आहेत. यामुळे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असून संबंधित प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वीज मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देणे, बदलाचे कारण स्पष्ट करणे तसेच जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग ग्राहकांच्या उपस्थितीत नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेचे पालन होत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे.

स्मार्ट मीटरच्या खर्चाबाबत, बिलिंग पद्धतीबाबत आणि मीटरच्या अचूकतेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याने भविष्यात वाढीव वीजबिलांचा भार सहन करावा लागेल, अशी भीती अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

महासंघाच्या प्रमुख मागण्या

  • ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवलेले सर्व स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुने मीटर पूर्ववत बसवावेत.
  • शासनाचा स्पष्ट आदेश व ग्राहकांची संमती मिळेपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी.
  • ग्राहकांच्या परवानगीशिवाय खाजगी जागेत प्रवेश करून मीटर बदलणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी.

दरम्यान, या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनावर फारूक शेख, कानिफनाथ सरपने, विजय मेहेर, अमित आगरकर, धनंजय गोफणे, जमीर शिकलकर यांच्यासह कुंभेफळ येथील शमशुद्दीन सय्यद, सतीश सोनटक्के, यास्मिन शेख, विक्रम आडगळे, उज्वला हजारे, सुनिता सोनटक्के, सर्जेराव सोनटक्के, बळीराम आवाळे, रत्नमाला कांबळे, गंधारबाई कावरे, भानुदास मेहेर आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

– माझं गांव माझं शहर

error: Content is protected !!