माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे एका दिव्यांग व्यक्तीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आंबी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांची रवानगी धाराशिव जिल्हा कारागृहात केली आहे. पोलिसांच्या या त्वरित भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नेमके प्रकरण काय?
चिंचपूर बु. येथील दिव्यांग अशोक भराटे यांच्या कुटुंबाला अत्याचार आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी दिव्यांग हक्क अधिनियम (कलम ९२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून आंबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाचे आभार दिव्यांगांवरील अन्यायाविरोधात पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल दिव्यांग बांधवांच्या वतीने पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड व त्यांच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग उद्योग समुह संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. “समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, पोलिसांच्या या कारवाईमुळे आम्हाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे,” असे मत दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.
सदरील प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षेची मागणी दिव्यांग करत आहेत आरोपीला त्वरित अटक करून दिव्यांगाना न्याय मिळवून देण्याची पोलिसांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असली तरी, संबंधित आरोपींना न्यायालयातून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही दिव्यांग बांधवांनी केली आहे.
या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यतत्परतेची चर्चा असून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
