धाराशिव दि.२७(माझं गांव माझं शहर): पंचायत समिती परिसरातून समता नगरकडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करावा, अन्यथा आडवे टाकलेले सिमेंट पोल उखडून टाकण्यात येतील, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक 145 मधून जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा 12 मीटर रुंदीचा रस्ता असून, तो पंचायत समितीच्या क्वार्टरसमोरून जातो. गेल्या सुमारे 50 वर्षांपासून नागरिक या रस्त्याचा वापर करत आहेत. या मार्गावरून नागरिकांना दवाखाने, कार्यालये, बँका आदी ठिकाणी जाणे सोयीचे होते.
दरम्यान, शासनाच्या मंजूर विकास योजनेत या रस्त्याला 12 मीटर डी.पी. रोडचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, पंचायत समितीने समता कॉलनीच्या बाजूने सिमेंट पोल आडवे टाकून हा रस्ता बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या वहिवाटीला बेकायदेशीर अडथळा निर्माण झाला असून, हा प्रकार नगररचना कायद्याचे उल्लंघन असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.
अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्ता बंद करण्यामागील कारण स्पष्ट न झाल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रस्ता तात्काळ खुला करण्याची मागणी केली. तसेच पुढेही रस्ता बंद ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, पंकज पाटील, अमित उंबरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.