धाराशिव जात पडताळणी कार्यालयाचा कारभार रामभरोसे; नागरिकांना जमिनीवर बसण्याची वेळ

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नागरिकांना अत्यंत गैरसोयींचा सामना करावा लागत असून, मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे.

शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी कार्यालयात बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ येत आहे. कार्यालयातील टेबल व बाकडे मोडकळीस आले असून अनेक बाकडी तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे तासनतास रांगेत थांबणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतून जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिक या कार्यालयात येतात. मात्र, प्रतीक्षेसाठी साधी बसण्याचीही सोय नसल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना व्हरांड्यात किंवा पायऱ्यांवर बसून वेळ काढावा लागत आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या कार्यालयाला ‘बार्टी’ (BARTI) मार्फत निधी उपलब्ध होत असतानाही अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “एकीकडे शासन डिजिटल इंडियाचा गाजावाजा करत आहे, तर दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयात बसण्यासाठी खुर्चीही उपलब्ध नाही,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!