दिव्यांगाना मिळणार फिरते दुकान ;अनुदानासाठी २५ कोटीची तरतूद..

मुंबई: राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगाना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना फिरत्या दुकानांसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत अपंग व्यक्तींना ई वाहन पुरविले जात असून निधीअभावी ही योजना रखडली होती. या योजनेला आता पुन्हा गती देण्यात आली असून यासाठी सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अपंग व्यक्तींना रोजगारासाठी ई वाहनावरील फिरते दुकान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपंगांना फिरते ई वाहन दुकान पुरविण्यासाठी सरकारकडून जिल्हा परिषदांना निधी पुरविला जातो. याअंतर्गत पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (ई टेम्पो मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) पुरविले जाते. या फिरत्या दुकानाची किमत ३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. या ई टेम्पोसाठी लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली जाते. मात्र मागील काही काळापासून या वाहनांसाठी निधी मिळत नसल्याने ही योजना बारगळली होती. मात्र यासाठी आता सरकारकडून २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी दिव्यांग कल्याण विभागाकडून वितरित केला जाणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

योजनेचे उद्देश काय आहेत?
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांसह जीवन जगण्यास सक्षम करणे.
कधी आणि कुठे कसा करावा अर्ज ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांकरिता https://register.mshfdc.co.in हे नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

error: Content is protected !!