परंडा, दि. ९- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. पंचायत समितीच्या १० पैकी ६ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपली एकहाती सत्ता राखली आहे, तर जिल्हा परिषदेच्या ५ पैकी २ जागांवर भगवा फडकवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, तानाजी सावंतांची रणनीती यशस्वी ठरल्याने विरोधकांना मोठा फटका बसला. परंडा जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ३० उमेदवार तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
या निवडणुकीत एकूण ७३ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांना मतदारांनी सेवेची संधी दिली आहे. तर ५८ उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे सेना, भाजप, काँग्रेस, मनसे व अपक्षांनी कंबर कसली होती. अपक्षांमुळे पक्षाच्या उमेदवारांना फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला २, ठाकरे गटाला १ जागेवर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापित पक्षांच्या मतांचे गणित बिघडल्याचे दिसून आले. एका चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब खरसडे यांनी दिग्गज उमेदवार अविदाबाई जगताप यांचा ८१८ मतांनी पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विजयी उमेदवारांची घोषणा होताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. या निकालाने परंडा तालुक्यात पुन्हा एकदा आमदार तानाजी सावंतांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे.