परंडा (प्रतिनिधी) :बावची येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता.
या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी उत्सुकता तसेच आपल्या वैभवशाली वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.
या शैक्षणिक भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिक कचरा, कागद व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.
या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना तसेच इतिहासाविषयी आदर निर्माण होतो, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.