परंडा,(तानाजी घोडके) दि. २६-तालुक्यातील पिंपळवाडी येथील पाच शेतकऱ्यांच्या २० एकर उसाला लागलेली आग विझवून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्यापासून वाचविण्यात पिंपळवाडी ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेला यश आले आहे.
पिंपळवाडी येथील रामचंद्र भीमराव खबाले, महारुद्र भीमराव खबाले, केशव गोरख खबाले, अर्जुन गोरख खबाले, तेजस नानासाहेब खबाले यांच्या शेतातील ऊसाला मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागलेली आहे. हे कळताच, गावचे सरपंच रुपेश काळे यांनी ग्रामसुरक्षा (१८००२७०३६००) ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी आले व ऊसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले. उर्वरित २० एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामसुरक्षा यंत्रणेने ग्रामस्थांच्या सहकार्याने विझवली आहे.
यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून पिंपळवाडीचे सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे. पिंपळवाडी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी १५ वेळा वापर करण्यात आला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील ६१८ गावे सहभागी आहेत. जिल्ह्यातील ६ लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.