परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा आरोग्य कणा समजला जाणाऱ्या परंडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांना वेळेत सेवा सुविधा मिळत नाहीत.
परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गोळ्यांचा ,औषधांचा तुटवडा नेहमीच भासत आलेला आहे. परंडा येथे येणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील रुग्णांना उपचार न करता नेहमीच रेफर केले जाते. या ठिकाणी वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी बदली झाल्यापासून अद्यापही नेमणूक झालेली नाही. अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडूनअसणारे डॉक्टर व कर्मचारी यांचे राज चालू आहे. त्यात सध्या प्रभारी राजामुळे संबंधित विभागातील कर्मचारी यांच्यावर वचक नाही. कर्मचारी डॉक्टर वेळेत उपस्थित राहत नाहीत. नेमून दिलेल्या वेळा याचे पालन करत नाहीत “कधीही या कधीही जा कोण विचारणार नाही? असा प्रकार परंडा उपजिल्हा रुग्णालयात पाहावयास मिळत आहे. परंडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना वेळेत नीट तपासणी होत नाही. रुग्णांना ताटकळत बसावे लागते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही . नेमून दिलेल्या विभागांमध्ये डॉक्टर वेळेत हजर नसतात. प्रशासनाने या रुग्णालयाची निश्चित वेळ व येण्या जाण्याचा वेळ दर्शनी भागांमध्ये लावून नागरिकांना सुचित करावे. जेणेकरून नागरिक वेळेत उपस्थित राहतील .योग्य उपचार मिळेल अशा प्रकारच्या सुविधावर वरिष्ठ अधिकारी धाराशिव व विभागीय अधिकारी लातूर यांनी लक्ष द्यावे.
रुग्णालयातील आवक, जावक ,पुरवठा इत्यादी विभागाची चौकशी करावी , क्षयरोग विभाग, अतिदक्षता विभाग ,ओपीडी विभाग , रक्त लघवी तपासणी रिपोर्ट वेळेवर दिले जात नाहीत अशा अनेक समस्यांना सामना रुग्णांना करावा लागत आहे. वरील समस्यांचा पाढा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात खूप मोठा आहे. तरी वरिष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दिलासा द्यावा. अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.