परंडा: परंडा तालुक्यातील बहुतांश लोक पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त स्थाईक झाले असून दिवाळी सणानिमित्त सर्व तालुक्यातील रहिवासी असलेले लोक गावी येत आहेत. परंतु बार्शी व कुर्डुवाडी येथुन दु. १२.०० च्या नंतर दोन्ही ठिकाणांवरुन प्रवाशांना येण्यासाठी खूप उशीराने बस सोडण्यात येते. ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशी संख्या खूप जास्त असल्याने परंडा तालुक्यातील प्रवाशांना परंडा तसेच ग्रामीण भागात जाण्याकरिता त्रास होत आहे.
दिवाळी सणानिमित्त सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत या मार्गावर तात्काळ जादा बस फेऱ्या कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आगार व्यवस्थापक, परंडा बस डेपो यांच्यामार्फत विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, धाराशिव यांना करण्यात आली.
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, व्यंकटेश दिक्षित तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.