परंडा(तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण परिसरात आज आलेल्या भीषण पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. जीव धोक्यात घालून करण्यात आलेल्या या यशस्वी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
खासदार निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वाघेगव्हाण परिसरात पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. ही सुटका केवळ एक कार्यवाही नव्हती, तर मानवतेसाठी दिलेला एक नवा श्वास होता.”
या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुका प्रमुख मेघराज पाटील, उपजिल्हाप्रमुख रेवण ढोरे आणि जैन मालक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. बचावलेल्या नागरिकांसाठी केवळ सुटकेपुरते मर्यादित न राहता, त्यांना तातडीने जेवण, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.
“संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची ताकद हीच खरी समाजशक्ती आहे. जनतेची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत,” असे सांगत त्यांनी या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. “आपत्ती कितीही मोठी असली तरी, जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच आमचे ध्येय आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या जलद आणि यशस्वी बचाव कार्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून प्रशासनाच्या आणि स्थानिक नेतृत्वाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.