परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील (गट अ वर्ग १ ) परीक्षेतून डॉ. अभिराज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांच्या नावाची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे. डॉ. सूर्यवंशी हे मुळचे परंडा तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी आहेत. डॉ. अभिराज सूर्यवंशी यांचे एमबीबीएस एमडी शिक्षण आहे. शासकीय सेवेत घेण्यापूर्वी ते वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी (नेवासा जि. अहिल्यानगर) या पदावर ते कार्यरत होते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी उत्तमरीत्या सांभाळला. सद्यस्थितीत जक पुणे परिमंडळाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र या विभागीय प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आगामी काळात शासनाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील समकक्ष पदावर व तदनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर त्यांना संधी मिळेल. या यशाबद्दल त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.