कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

कळंब,२९( माझं गांव माझं शहर) कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलने आपल्या परंपरेला साजेसा असा एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. आज स्टेट लेव्हल ज्युनिअर आयएएस स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या कॅनव्हास शाळेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला श्री. हेमंत ढोकळे, तहसीलदार कळंब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत फुलांच्या गुच्छांनी करण्यात आले. यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाची झळाळी स्पष्टपणे दिसत होती.आपल्या मनोगतात श्री. हेमंत ढोकळे, तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारच्या शालेय स्पर्धा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या ठरतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानवृद्धीच होत नाही तर आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव व नेतृत्वगुणही विकसित होतात.”

या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, शाळेने मुलांना दिलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि स्पर्धेची तयारी ही त्यांच्या यशामागची खरी प्रेरणा आहे.

शाळेचे चेअरमन श्री. रवी नरहिरे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सांगितले की, “कॅनव्हास स्कूल सदैव आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व नाविन्यपूर्ण शिक्षण देत राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी शाळेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिक उंची गाठण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीचा संचार झाला असून संपूर्ण शाळा परिवाराने या यशाचा अभिमान व्यक्त केला. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान नसून शाळेच्या शैक्षणिक बांधिलकीची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रचीती आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!