परंडा(माझं गांव माझं शहर) : तालुक्यातील डोमगांव येथील सिना कोळेगाव धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने शनिवारी सकाळी ७:०० वाजता ४ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता धरणाच्या एकूण २१ वक्र दरवाजांपैकी एकूण चार दरवाजातून पाणी विसर्ग सुरु झाला आहे. या चार दरवजांतून १ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सिनापात्रात सुरु करण्यात आला आहे.
धरण क्षेत्राच्या वरील क्षेत्रावर ऑगस्ट पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भूम, खर्डा, नगर जिल्हयातील बहुतांश जलस्रोत आधीच भरलीत. त्यामुळे जास्तीचं पाणी धरणांच्या सांडव्यामधून सीना नदीसह विविध नदीपात्रात मोठया प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आलेले आहे, सीना नदी मार्ग येणारे सर्व पाणी करमाळा तालुक्यातील संगोबा येथून सीना कोळेगाव धरणामध्ये जमा होतंय. तर दुसऱ्या बाजुने जामखेड तालुक्याच्या विविध जलस्रोताचा विसर्ग खैरी नदी, नळी नदीच्या माध्यमातून सीना कोळेगाव मध्ये येत आहे. धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोचला आहे. धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाकडून चार दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात आले होते.
त्यामुळे एकुण चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण प्रशासनाने पाणी पातळी व वरील भागातील पावसाची शक्यता गृहीत धरुन चार दरवाजे उघडुन पाणी पातळीवर नियंत्रण ठेवले आहे. दरम्यान, सिना नदीचा होणारा पाण्याचा विसर्ग व वाढती पाणी पातळीवर सिना कोळेगाव प्रकल्प अभियंता वेताळ गवळी हे विशेष लक्ष ठेवून आहेत. धरण उपविभागीय अभियंता वेताळ गवळी , सुनील सोनुने यांनी दिलेल्या माहितीनुसार सिना कोळेगाव धरणाची लांबी १६१६ मीटर असून ४२४ मीटर लांबीचा ओव्हरफ्लो सेक्शन आहे. सदर धरणाचा एकूण पाणीसाठा १५०.४९ दलघमी असून यामध्ये ७६.१८ दलघमी जिंवत पाण्यासाठ्याचे नियोजन आहे धरणाची टक्केवारी १०० टक्के आहे. पाण्याची आवक अजून सुरूच आहे. त्यामुळे आणखी पाऊस पडला तर सिना नदीकाठच्या गावांना धोका संभवतो म्हणूनच सिना कोळगाव प्रकल्प विभागाला आत्तापासूनच पाणी सोडण्याचं व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे. नदीपात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना सोलापूर धाराशिव येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत